माघमाहात्म्य

श्रीगुरुः शरणम्।

वाङ्मयं वासुदेवस्य गहनं सागरादपि।  चिंतनाय प्रवृत्तोsस्मि मंदोSप्यंतरशुद्धये।।1।।

विषयप्रवेश. श्रीदत्तार्जुनसंवाद.
 
मानवी देहाचे वास्तव स्वरूप.
 
व्रतवैकल्यांचे महत्त्व.
 
माघस्नानाचे विधान
 

 
तिलोत्तमाख्यान विकुंडलाख्यान कांचनमालिनीचे आख्यान ग्रंथाची मंत्रगर्भता.
 
 

विषयप्रवेश.

भगवान दत्तप्रभूंच्या लीला वर्णन करणारे साडेतीन हजार श्लोकांचे संस्कृत श्रीमद्दत्तपुराण श्रीटेंबेस्वामीमहाराजांनी इ.स.१८९२ साली ब्रह्मावर्त येथील चातुर्मासांत केले. १८९७ च्या वर्षी सिद्धपूर (गुजरात) येथे त्यावर टीका झाली. ह्या दत्तपुराणांत आठ अष्टके मिळून 64 अध्याय आहेत. पहिल्या दोन अष्टकात ज्ञानकांड, नंतर 4 अष्टकांचे भक्तिकांड आणि शेवटी २ अष्टकांचे कर्मकांड अशी रचना आहे. कर्मकांडाचा पूर्वार्ध (सप्तम अष्टक) हा श्रीदत्त आणि कार्तवीर्यार्जुन यांच्या संवादात्मक असून यांत माघस्नानाच्या माहात्म्याच्या अनुषंगाने सर्व वर्णांना, स्त्रीपुरुषांना सामान्य अशा कर्ममार्गाचे निरूपण आहे. ह्याच अष्टकाचे मराठी भाषांतर श्रीस्वामीमहाराजांनी 1900 साली चिखलदा येथील चातुर्मासात माघमाहात्म्य या नांवाने केले आहे. या ग्रंथांत मुख्यतः माघस्नानाने होणाऱ्या पापनाशाचे आणि पुण्यफळाचे वर्णन असले तरी त्याच्या अनुषंगाने विविध व्रते, इष्ट, दान आणि पूर्त कर्मे इत्यादि विषय आले आहेत. विकुंडलाला विष्णुदूतांनी केलेल्या उपदेशांत ते म्हणतात, कर्मैव कारणं तात जीवानां सुखदुःखयोः। बंधाय कारण कर्म कर्म मोक्षाय केवलम्।। जीवांच्या सुखदुःखांचे कारण कर्मच आहे ह्या संसारबंधनाचे कारणही कर्मच आहे आणि त्यांतून सुटकेचा उपायही कर्मच आहे. (दत्तपुराण (द.पु.) ५०:२७) हा प्रमुख विषय आहे. तिलोत्तमा, विकुंडल, कांचनमालिनी यांच्या आख्यानातून ह्या विषयांचे निरूपण रोचक आणि बोधक रीत्या केले आहे. कर्ममार्गाच्या आचरणातूनच पापक्षय, पापक्षयांतून चित्तशुद्धि, चित्तशुद्धीपासून सकाम आणि निष्काम भक्ति आणि शेवटी ज्ञान आणि ज्ञानानेच मोक्ष अशी क्रममुक्ति हेच ह्या ग्रंथाचे प्रयोजन आहे. हे श्रीस्वामीमहाराजांनी दत्तप्रभूंच्या मुखांतूनच माघमाहात्म्याच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. ज्ञानानेच मोक्ष होतो खास। परंतु ते न पापियास। लाभे म्हणोनि पापऱ्हास। शास्त्र खास करवी असे।। न होता पापक्षालन। न लाभे ज्ञानसाधन। साधनाविण न ठसे ज्ञान। म्हणोनि योजी शास्त्र हे।। प्रकृती प्राक्तनचेष्टा करवी। ह्या सद्धर्मे तीला बरवी। वळवितां मोक्षपदवी। अचूक पाविजे न कष्टे।।३३-३५।।(माघमाहात्म्य (मा.मा.)) ह्या ग्रंथाचे अधिकारी सर्व वर्णांचे, सर्व जातींचे आबालवृद्ध स्त्रीपुरुष आहेत. हे ह्या ग्रंथातील विविध कथानकांतून स्पष्ट होते. ह्या ग्रंथाचा संबंध बोध्यबोधकभाव आहे. श्रीदत्तप्रभूंनी कार्तवीर्याला, विष्णुदूतांनी विकुंडलाला, कांचनमालिनीने राक्षसाला केलेल्या उपदेशातूनच हा ग्रंथ प्रवाहित होत आहे. अशा ह्या माघ (मा अघ पापनाशक) बोधसरितेत किंचित् अवगाहन करून आपणही पावन होऊ या.

श्रीदत्तार्जुनसंवाद.

ग्रंथाच्या आरंभी श्रीगुरूंच्या नमनात्मक मंगलाचरण आहे. ॐकाररूपी मधुर रसाचे कर्णद्वारा पान करवून आवृत्तीलक्षण असाध्य भवरोगाचा ते नाश करतात. ज्यांचा तेजोमय उपदेश अविद्येच्या अंधाराचा निरास करतो असे ते सर्वांना अभय देणारे दत्तप्रभू आपले सद्गुरु असल्याचे सांगून त्यांच्या पाय चिंतल्याने सर्व अपाय दूर होतात आणि कलियुगात तेच लवकर प्रसन्न होणारे स्मृतिगामी तारक आहेत अशी ग्वाही देतात. त्रिविध ताप निवारणाऱ्या, आसक्तांना विरक्त करणाऱ्या त्या दत्तप्रभूंनी कार्तवीर्याला जो रोचक उपदेश केला त्याचे आपण भाषांतर करीत आहो हे स्पष्ट केले आहे.

यमादि अष्टांगयोग ज्याने संपन्न केला आहे, ज्याची स्मरणभक्ति परिपूर्ण आहे असा अर्जुन नित्य सह्याद्रीच्या शिखरावर येऊन दत्तप्रभूंचे दर्शन घेत असे. एकदां माघ महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत दत्तप्रभू स्नान करीत असलेले त्याने पाहिले. तेव्हां त्याने अत्यंत नम्रपणे प्रार्थनापूर्वक दत्तप्रभूंना प्रश्न केला की हे प्रभो! आपणच मला सांगितले की हा नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. ह्या देहांतच आपल्या शाश्वत पदाची प्राप्ति करून घेण्याची योग्यता आहे. अशा या दुर्लभ मानव तनूला, आधीच तीव्र थंडीने तो त्रासलेला असतांना भल्या पहाटे आणखी शीतल जलाने स्नान करून कष्टविणे हे मला योग्य वाटत नाही. त्यासाठी संकल्पही काय तर स्वर्गप्राप्तीचा!  तुच्छ स्वर्गसुखासाठी ह्या देवदुर्लभ मनुष्यदेहाला पीडा केल्याने ईश्वराचा क्षोभच नाही का होणार? मी आपला शिष्य आहे हे लक्षात घेऊन कृपा करून माझा हा संशय आपण दूर करावा.

अर्जुनाचा ही नम्र आणि प्रामाणिक शंका ऐकून दत्तप्रभूंना संतोष वाटला आणि त्यांनी त्याला उत्तर द्यायला आरंभ केला. अरे अर्जुना! वेदमाउलीने लोकांना वळण लावण्यासाठी त्यांच्या अधिकारानुसार फळाची आशा दाखवून हा उपाय योजला आहे. विषयांचीच ओढ असलेल्या प्रापंचिक माणसांना त्यांच्यापासून बाजूला करण्यासाठी वेद अशा युक्तीचा उपयोग करतो. अशा धार्मिक व्रतांनी लोकांनी आपल्या पापाचे क्षालन करून हळूहळू विषयपाशांपासून मोकळे व्हावे आणि क्रमाने मुक्ती साधावी हा त्याचा उद्देश्य आहे. चित्तशुद्धीसाठी यज्ञादिक कर्मांचे विधान वेदांनी केले आहे, ते यथार्थच आहे; पण ते ज्यांना घडत नाही, त्यांना हा व्रतवैकल्यरूपी उपाय वेदराजाने दाखविला आहे. शास्त्रांत अनेक यज्ञांचे वर्णन आहे. परंतु त्या सर्वांच्या अनुष्ठानासाठी कांही विशेष द्रव्यांची, कांही विशेष योग्यतेची, कांही विशेष अधिकाराची आवश्यकता आहे. विषयांच्या मागे धावून भयंकर कष्ट सोसणाऱ्या मानवांना त्यांची जाणीवही होत नाही. त्यांना धर्माच्या आचरणाने लाभणारे धन्यत्व कळावे म्हणून ही व्रते आणि वैकल्ये शास्त्राच्या मुखाने देवाने सांगितली आहे.

मानवी देहाचे वास्तव स्वरूप.

यानंतर या देहाचे स्वरूप अर्जुनाला सांगितले आहे. हा पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पांच महाभूतांचा देह रक्त, मांस, अस्थि अशा धातूंचा बनलेला आहे. ह्यांत वात, पित्त, कफ इत्यादि दोष भरलेले आहेत. कामाच्या मोहाचे हेच घर आहे. ह्याच्यामुळेच सतत भय वाटत असते. ह्याला जोपासायला आणि सुखात ठेवायलाच माणूस नको त्या गोष्टी नित्य करत असतो. स्त्रीच्या विटाळात जन्मलेला, विष्ठामूत्रांच्या मध्यात घडलेला आणि विष्ठामूत्रांसारख्या गलिच्छ वस्तूंनीच भरलेला हा देह नऊ द्वारांनी सारखा गळत असतो. ह्याला स्वच्छ करता करता उबग येतो. असा हा देह अंती पुरला तर कृमींनी भरून जातो; जाळला तर राख होतो; आणि प्राण्यानी खाल्ला तर विष्ठा होतो. वासनेचे हे माहेर। ममताहंतेचे हे घर। मोक्षस्वर्गनरकद्वार। दुर्धर दुष्पूर वंचक।।२७।।.  हे मोक्षाचे जसे द्वार आहे तसेच स्वर्ग आणि नरकाचेही आहे. याला कितीही काळजीपूर्वक सांभाळला तरी काळ केव्हा पळवून नेईल ते सांगता येत नाही. यांतला प्राण एकदा निघून गेला की याला शिवायला लोक कचरतात. अशा देहाचा अभिमान का बाळगावा? इतर देहात नसलेला एकच मोठा गुण यांत आहे. आत्मा आणि अनात्मा, जड आणि चैतन्य ह्यांची पारख हा करतो. म्हणूनच ह्याने मोक्ष लाभू शकतो. हे खरे असले तरी ह्याचा वावगा लोभ धरू नये. ह्या देहाचे फाजील लाड केल्यानेच ईश्वराचा क्षोभ होणार नाही का? सारांश ह्या देहाला विनाकारण कष्टवू नये हे तुझे म्हणणे खरे असले तरी शास्त्राच्या आज्ञेने धर्मलाभाकरिता त्याला कष्ट दिले तर ते अकारण कसे म्हणता येईल? बायकामुलांकरिता सायास करण्यापेक्षा धर्मसाधनासाठी केलेले कधीहि उत्तमच!

व्रतवैकल्यांचे महत्त्व.

ज्ञानानेच मोक्ष होतो (ज्ञानादेव तु कैवल्यम्) हे खरेच. पण पापी माणसाला ते ज्ञान लाभणे तर दूरच पण ते त्याची वार्ताही त्याला आवडत नाही. ज्ञानाची रुचि निर्माण व्हायला पापक्षय होणे आवश्यक आहे. नंतरच क्रमाने ज्ञानाची आवड उत्पन्न होऊन ज्ञानाच्या साधनाचा लाभ होतो. त्या साधनानेच ज्ञान ठसावते आणि मोक्ष लाभतो. प्रकतीच्या पारतंत्र्यात सांपडलेल्यांना कर्माच्या चक्रातून सुटण्याची युक्ति म्हणजे हे सद्धर्म ही शास्त्रांत सांगितलेली व्रतवैकल्ये, आहेत.

माघस्नानाचे विधान

माघस्नान हे असेच एक व्रत आहे. हा माघ नांवाप्रमाणेच अघनाशक आहे. मकर राशीत सूर्य असतांना त्याच्या उदयापूर्वी स्नान केल्याने सर्व पातकांचा नाश होऊन अढळ पदाची प्राप्ती होते. मकरस्थे रवौ यो हि शीतार्तोऽप्युदिते रवौ। स्नाति पापैर्विमुक्तः स क्रमाद्ब्रह्माधिगच्छति।।द.पु. ४९:२३।। तेवढ्यासाठी हे राजा, माणसाने विधिवत् माघस्नान करावे. प्रथम शुद्ध होऊन (हातपाय धुवून) प्राणायाम आणि आचमन करून, मकरस्थे रवौ माघे इत्यादि देशकालांचा उच्चार करून श्रीविष्णोः संप्रीत्या माघस्नानं करिष्ये असा संकल्प करावा. तसेच हे गोविन्द, अच्युत, माधव, देवेश अनेन स्नाने मम शरणं भव अशी प्रार्थना करावी. उष्णोदक, विहीर, नदी यांच्या स्नानाचे उत्तरोत्तर अधिक आहे. संगमावर, विशषतः प्रयाग येथील गंगा-यमुनासंगमावर केलेल्या माघस्नानाचे अमित फळ आहे. त्रिवेणीच्या माघस्नानाने सर्व पापे नष्ट होऊन, स्वर्गात उत्तम सुख भोगून अंती विष्णुपदाची प्राप्ति होते. हा सर्व महिनाभर अल्पाहार, मितभाषण, नामस्मरण, हविष्यान्नाचे भोजन, भूमीवर शयन, भगवान विष्णूंची पूजा इत्यादि नियम पाळावे. ब्राह्मणांना घोंगडी, वस्त्रे आणि भोजन द्यावे. रोज भक्तीने हरिकीर्तनाचे श्रवण करावे. महिनाभर व्रत पूर्ण झाले की यथाशक्ति उद्यापन करून ब्राह्मणभोजन घालावे.  (द.पु.५५:३-१०).

माघ महिन्यांत सूर्य मकर राशीला येतो तेव्हा पहाटेच्या वेळी तेव्हां जलामध्ये अतीव पावित्र्य आणि मनोरम सुखकारकता येते. त्यात ब्रह्मदर्शनाला साह्यभूत असा परमकल्याणकारी रसाचा संचार होतो. भगवान शंकर आणि अग्नि त्या द्वारे साधकांच्या पापांचे निवारण करणारे रसायन त्या जलांत अर्पितात. त्यामुळे हे जल शाप, द्रोह, असत्य भाषण इत्यादींपासून उगवलेले विशेषतः माघमासांत मानवांचे समग्र पाप प्रवाहित करतात (धुऊन टाकतात). ज्या जलधारांत वरुण, सोम, विश्वेदेव अग्नि इत्यादि देवता ऊर्जेचा आवेश करतात त्या (स्नान करणाऱ्याला) पवित्र करणार नाहीत का?

¨ÉEò®úºlÉä%¯ûhÉä%PÉPxªÉ +É{É& ¶ÉÖrùÉ ¨ÉªÉÉä¦ÉÖ´É&* ®ú¨ÉhÉ񻃮 ¨É½þÉä pù¹]ÖÆõ ªÉɺÉÉÆ ʶɴÉiɨÉÉä ®úºÉ&**40**

<ǶÉÉxÉÉ´ÉɪÉÇ{ÉÉ{ÉÉxÉÉÆ SɹÉÇhÉÒxÉÉÆ IɪÉxiªÉ =iÉ* ¦Éä¹ÉVÉÆ nùnùiÉä ¶ÉÆ¦ÉÖªÉÉǺ´ÉÎMxɦɿ¹ÉVÉÉÊxÉ SÉ**41**

|ɴɽþxiÉÒnù¨ÉÉ{ÉÉä%¨ÉÚªÉÇÎiEòÎ\SÉqÙùÊ®úiÉÆ xÉ®äú* ¶ÉÉ{ÉpùÉä½þÉxÉÞiÉÉtÖilÉÆ ¨ÉÉPɨÉɺÉä ʴɶÉä¹ÉiÉ&**42**

ªÉɺÉÚVÉÈ ´É¯ûhÉ& ºÉÉä¨ÉÉä Ê´É·Éänäù´ÉÉ ¨ÉnùÎxiÉ SÉ* ´Éè·ÉÉxÉ®úÉä ªÉɺ´ÉÉʴɹ]õºiÉÉ& ºÉiªÉÉä xÉ {ÉÖxÉÎxiÉ ÊEò¨ÉÂ**43** द.पु. 54

तिलोत्तमाख्यान

याचा एक पूर्ववृत्तांत इथे दत्तप्रभूंनी सांगितला आहे. रेवा-कपिला संगमावर एक ऋचीका नांवाची बालविधवा ब्राह्मणी रहात होती. ती अत्यंत सदाचरणी आणि धर्मरत असून अनेक व्रतवैकल्यांनी तिने आपला देह झिजवला. ती नियमित माघस्नानाचे व्रत आचरीत असे. अशा रीतीने साठ माघांत तिने ते व्रत केले. त्या योगाने तिचे चित्त शुद्ध होऊन ती सहजच विष्णुध्यानात राहूं लागली. मृत्यूनंतर ती विष्णुलोकांत तिलोत्तमा नावाची वरिष्ठ अप्सरा झाली. अनुपम सौंदर्याची जणू खाणच अशी ती तिलोत्तमा नृत्यगीतातही कुशल होती. त्यामुळे भूलोकांत जेव्हा सुंद आणि उपसुंद या उन्मत्त असुरबंधूनी उच्छाद मांडला तेव्हां ब्रह्मदेवांनी तिच्या साह्याची याचना केली. सुंदोपसुंदाना त्यांच्याखेरीज इतरांकडून मृत्यू येऊं नये असा वर ब्रह्मदेवांनीच दिला होता. त्या वेळी तिलोत्तमाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना मोहून टाकले. तिच्या प्राप्तीसाठी ते एकमेकांच्या जिवावर उठले. शेवटी गदायुद्धांत ते दोघेही परस्परांकडून मारले गेले. तिच्या त्या कार्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने तिला सूर्यलोकांत स्थान दिले. अजूनही जीवन्मुक्त तिलोत्तमा तिथे ब्रह्मानंदात निमग्न आहे.

विकुंडलाख्यान

यानंतर दत्तप्रभूंनी हेमकुंडल नांवाच्या एका न्यायने धन मिळविणाऱ्या धार्मिक वृत्तीच्या वैश्याच्या श्रीकुंडल आणि विकुंडल या पुत्रांची गोष्ट सांगितली. हेमकुंडल दानधर्म करून सद्वर्तनाने, धर्माचरणाने आणि ईश्वरभक्तीने उत्तम गतीला गेला. त्याच्यामागे त्याचे दोन्ही मुलगे वाईट संगतीला लागले. आई व इतर वडीलधाऱ्यांचे न ऐकतां व्यसनाधीन होऊन, वेश्या, नट, भाट इत्यादि दुर्जनांवर त्यांनी सर्व धन घालवून टाकले. सरतेशेवटी गांव सोडून रानांत राहून भिल्लांच्या संगतीने लूटमार करून ते पोट भरू लागले. अशा रीतीने कांही काळ गेल्यावर दैवयोगाने मोठ्या भावाला वाघाने खाल्ले आणि त्याच वेळी धाकट्याला साप चावून मृत्यू आला. यमदूतांनी दोघांना धरून यमधर्मासमोर उभे केले. त्याने मोठा भाऊ श्रीकुंडलाला नरकाला पाठविले आणि धाकट्या विकुंडलाला वैकुंठाला नेण्याची आज्ञा दिली. विष्णुदूत विकुंडलाला वैकुंठाला नेत असतां तो त्यांना म्हणाला,अहो, आम्ही दोघे भाऊ जन्मभर एकत्रच राहिलो. जे कांही पापपुण्य केले ते आम्ही एकत्रच केले. असे असतांना आमची गती मात्र एवढी भिन्न कशी असूं शकते? ”  तेव्हा विष्णुदूतांनी त्याला सांगितले की, ज्याचे कर्म त्यालाच भोगावे लागते. तू म्हणतोस ते खरे असले तरी हरिमित्र ब्राह्मणाचा पुत्र तुझा मित्र होता. त्याच्या संगतीने तू दोन वेळां माघस्नान केलेस. सज्जनांबरोबर सात पावले चालले तरी त्या मैत्रीच्या योगाने मोठ्यात मोठे पापही धुवून जाते. (सतां साप्तपदी मैत्री पुनन्ति उरुतरादघात्।। द.पु. ४९:३७।।) एका स्नानाच्या पुण्याने तुझे सर्व पाप नष्ट झाले आणि दुसऱ्या स्नानाच्या पुण्याने शाश्वत वैकुंठ लोक मिळाला. या वेळी विष्णुदूतांनी शास्त्रांनी पुरस्कारलेल्या विविध धर्मांचे निरूपण केले आहे. नित्य आणी नैमित्तिक कर्मे, यज्ञ, दान आणि पूर्त कर्मांचे स्वरूप विशद केले. एकादशी इत्यादि व्रतें, शालिग्रामादि अर्चने, तुलसी, बेल, अश्वत्थ, वट इत्यादि वृक्षांच्या रोपणाचे महत्त्व इत्यादि पुण्यकर्में सांगितली आहेत. शेवटी विकुंडलाच्या प्रार्थनेने मोठ्या भावाच्या उद्धाराकरिता त्याने सात जन्मांपूर्वी केलेल्या शाकल मुनींच्या ब्रह्मज्ञानी पुत्रांच्या केलेल्या आतिथ्याचे पुण्य त्याला अर्पण करायली सांगितले. त्याप्रमाणे तसे करून विकुंडलाने आपल्या भावाची नरकातून सुटका केली.

हे आख्यान सांगून झाल्यावर अर्जुनाला दत्तप्रभूंनी पुन्हां सदाचरणाचे महत्त्व सांगितले आहे, वेळ न टळू देतां जे माघस्नान करतात त्यांचे मळ आपोआप गळून जातात. प्रयत्नपूर्वक शास्त्रविहित व्रते करणाऱ्यांच्या कामना जरी असल्या तरी कालांतराने त्यांची बुद्धी पालटून ते निष्काम होतात. भक्ति, श्रद्धा आणि ध्यान यांनी आत्मज्ञानाचा लाभ होतो. व्रतांच्या आचरणाने भक्ति घडते. भक्तीने अंतःकरण शुद्ध होऊन मग आपोआपच ध्यान लागते. घर जसे खांबांच्या आधाराने उभे असते तसेच ज्ञान भक्तीच्या आधाराने उभे असते. त्यामुळे माघस्नानाला क्षुद्र साधन मानू नये असा निष्कर्ष काढला आहे.

कांचनमालिनीचे आख्यान

कैलास पर्वतावर कांचनमालिनी नावाची एक अप्सरा पार्वतीमातेची सखी होती. ती दरवर्षी माघ महिन्यात प्रतिदिन नियमाने योगबळाने प्रयागच्या संगमावर येऊन माघस्नान करीत असे. स्नानानंतर भगवान शंकरांना अभिषेकासाठी संगमाचे पाणी घेऊन इकडे-तिकडे न पाहता ती कैलासावर परत येई व शिवाची पूजा करी. एके दिवशी ती अशी ओलेत्याने परतताना एक भयानक ब्रह्मराक्षस तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तो राक्षस तिच्याजवळ येतांच तिच्या ओल्या पदराचे तुषार त्याच्या अंगावर पडले. त्या जलाच्या प्रभावाने त्या राक्षसाचा क्रूरभाव जाऊन तो शांत झाला आणि त्याची पूर्वजन्मीची स्मृति जागी झाली. ह्या देवीच्या सान्निध्याने आपल्या चित्ताला शांति लाभली हे त्याच्या लक्षात येऊन तो तिच्या चरणी लीन झाला. तो तिला म्हणाला, हत्तीएवढे प्रचंड जीव खाऊनही मला हजारो वर्षात जी तृप्ती लाभली नाही ती तुझ्या दर्शनाने आज लाभली. हे देवी, तू आहेस तरी कोण?” कांचनमालिनीने आपला परिचय देऊन आपला माघस्नानाचा नियम सांगितला. त्याला लाभलेल्या अपूर्व शांतीचे कारण हे माघमासातले जलच असल्याचे सांगून तिने आपला पूर्ववृत्तांत त्याला निवेदन केला. कलिंग देशात वेश्याकुलात जन्मलेली ती एक लावण्यसंपन्न युवती होती. आपल्या रूपसौंदर्याने तिथल्या राजासकट अनेक संपन्न युवकांना भुलवून लुबाडले. अनेकांचे संसार उध्वस्त केले. अशा पापाचरणात मद्य-मांस सेवनांत तारुण्य घालवल्यावर म्हातारपण आले. तिच्या एका कटाक्षासाठी जीव टाकणारे आता तिच्या वाऱ्याला उभे राहीनात. दैवयोगाने एकदा तिने माघ महिन्यात माघमाहात्म्याचे श्रवण केले. त्या वेळी आपल्यासारख्या पाप्यांना मृत्यूनंतर कशा भयंकर यातनांना सामोरे जावे लागते ते ऐकून तिला उपरति झाली. तेव्हां एका सात्त्विक ब्राह्मणाला शरण जाऊन तिने ह्या पापातून सुटकेचा उपाय विचारला. त्याला तिची दया येऊन त्याने तिला प्रयाग तीर्थावर जाऊन माघस्नान करायचा उपदेश केला. तिची श्रद्धा वाढविण्यासाठी त्याने तिला गौतम ऋषीचा वेष घेऊन कपटाने अहिल्येचे पातिव्रत्य भंग करणाऱ्या इंद्राची गोष्ट सांगितली. गौतम ऋषींच्या सापाने त्याच्या अंगावर एक हजार व्रण उत्पन्न झाले. त्या किळसवाण्या दुःखद अवस्थेतून सुटण्यासाठी त्याने देवगुरु बृहस्पतींच्या आज्ञेने माघ महिन्यात त्रिवेणीसंगमावर जाऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचे व्रण जाऊन त्यांच्या ठिकाणी त्याला एक हजार डोळे आले. त्या ब्राह्मणाच्या उपदेशानुसार त्या वेश्येने सूर्य मकर राशीत असता माघ महिन्यात प्रयागला जाऊन तीन दिवस स्नान केले. त्यातीनच स्नानांनी तिचे पाप धुऊन गेले आणि तिला अप्सरत्व प्राप्त झाले. यानंतर त्या ब्रह्मराक्षसाने आपण पूर्वजन्मी काशीक्षेत्रात षट्शास्त्री ब्राह्मण असूनही कसलेही नित्य-नैमित्तिक कर्म केले नाही की कसले इष्ट, पूर्त, दान केले नाही. सदैव अभक्ष्यभक्षण करून दुराचारांत जन्माचे मातेरे केले. पण काशीक्षेत्रात मरण आल्याने आपल्याला यमाच्या शासनाला सामोरे जावे लागले नाही. काशीत मरणाऱ्या पाप्यांना भैरवाचा दंड असतो. भैरवाने मला भूत-प्रेतादि नऊ योनीत फिरवून शेवटी हा दपावा ब्रह्मराक्षसाचा जन्म दिला. इथे मला साठ हजार वर्षे झाली. आपल्या काशीवासाच्या पुण्याने कांचनमालिनीचे दर्शन झाले असे सांगून तो ब्रह्मराक्षस तिला शरण गेला. कांचनमालिनीने त्याची दया येऊन आपल्या एका माघस्नानाचे पुण्य त्याला अर्पण केले. त्या पुण्याने तो ब्रह्मराक्षस दिव्यदेह धारण करून स्वर्गात गेला.

शेवटी दत्तप्रभूंनी अर्जुनाला परत एकदा सांगितले, श्रुतिमाउली जीवाच्या अंतिम कल्याणाचा आशय ठेवूनच, ऐहिक फलाचे आमिष दाखवून भक्तिमार्गाला लावून तारते. म्हणजेच जीव आणि आत्मा यांचा भेद नाहीसा करते. 

हा दत्तार्जुनसंवाद। माघमाहात्म्ये विशद। हो, हा जीवात्मभेद। अखेर पद दे ध्रुव।। माघमाहात्म्य ३४३।

ग्रंथाची मंत्रगर्भता.

शेवटी या ग्रंथाचा आणखी एक विशेषाचा निर्देश करून ह्या लेखाचा समारोप करू या. या ग्रंथाच्या प्रत्येक ओवीची आद्याक्षरे क्रमाने जोडली असता 343 अक्षरांचा श्रीदत्तमालामंत्र तयार. श्रीउमामहेश्वर तंत्रांतील श्रीदत्तकल्पातील हा प्राचीन मंत्र अशा रीतीने ह्या प्राकृत ग्रंथांत गुफण्यामागे स्वामीमहाराजांचा विशेष उद्देश्य आहे. मंत्रशास्त्राच्या नियमांप्रमाणे ह्या मंत्रांचे विधिपूर्वक अनुष्ठान करण्याचा अधिकार (Eligibility) नाही. तरी पण अशा मंत्रांचे अप्रत्यक्ष का होईना अनुष्ठान श्रद्धाळू लोकांना घडावे अशा लोकोपकारक भावनेने प.प.श्रीटेंबेस्वामी महाराजांनी अशा वैदिक, तांत्रिक मंत्रांची गुंफण विविध ग्रंथांतून आणि स्तोत्रांतूनही केली आहे. माघमाहात्म्य हा ग्रंथ कुणालाही वाचतां येण्यासारखा मराठी छोटेखानी ग्रंथ आहे. आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे सर्व वर्णांच्या आणि आश्रमांच्या आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना ह्यांतून कर्मयोगाचे, धर्माचरणाचे आणि भक्तिमार्गाचे उत्कृष्ट मार्गदर्शन होतेच. त्याचबरोबर श्रीदत्तमालामंत्रासारख्या प्रभावशाली मंत्राचे अप्रत्यक्ष आवर्तनही होते.

अशा ह्या आकाराने लहान पण प्रभावाने महान ग्रंथाचा यथामति यथाशक्ति संक्षिप्त परिचय आपण करून घेतला. तो श्रीगुरुचरणी समर्पित असो. 

 

(ग्रंथ आपल्य संगणकावर उतरून घेण्यासाठी लॉगिन् करून डाउनलोड पृष्ठावर जावे.)

  Top